
धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण रक्षणासाठी प्रशासनाने तब्बल 15 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. बॅनरबाजी, जाहिरातबाजी करत ही मोहीम मोठ्या थाटात उभारली जात आहे. मात्र, जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत — कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, भुम, परंडा — मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढत चालला आहे.
प्रशासन झाडे लावण्याच्या तयारीत गर्क असताना, मोकाट जनावरांच्या समस्येकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. नगरपालिका आणि स्थानिक प्रशासन केवळ झाडे लावण्याच्या घोषणांपुरतेच मर्यादित राहिले असून, मोकाट जनावरांविरोधात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
कळंब शहराचे चित्र या समस्येचं ठळक उदाहरण आहे. नगरपालिकेकडे कोंडवाडा असूनही तो निष्क्रिय आहे. रस्त्याच्या मधोमध फिरणारी जनावरे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत आहेत.
महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की, जर ही झाडे लावली गेली, तर त्याचे संरक्षण कोण करणार?
मोकाट जनावरे ही झाडांची नासधूस करणार नाहीत याची काय हमी?
जिल्ह्यातील सामान्य नागरिक यावर संतप्त असून त्यांचा थेट सवाल प्रशासनाला आहे —
“बॅनर लावणं सोपं आहे… पण झाडं जगवण्याची तयारी आहे का?”
आता तरी प्रशासनाने मोकाट जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कारवाई करावी, अन्यथा ही 15 लाख झाडांची योजना केवळ कागदावरच राहील, असा इशारा पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.