२५ लाखांची लूट नाटक ठरली! बँक मॅनेजरच निघाला चोर – स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई

धाराशिव (प्रतिनिधी) –२५ लाख रुपयांची लूट करून स्वतःवरच हल्ला झाल्याचे नाटक रचणाऱ्या लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नळदुर्ग शाखेच्या मॅनेजरचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने त्याला गजाआड केले आहे. सदर घटना ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता सोलापूर महामार्गावरील ईटकळ टोल नाक्याजवळ घडली होती.
प्रारंभी नळदुर्ग येथून सोलापूरकडे रोख रक्कम घेऊन जात असलेल्या मॅनेजर कैलास घाटे यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी डोळ्यात चटणी टाकून लूट केल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्याने केलेल्या तपासानंतर ही लूटच नव्हे तर मॅनेजरनेच रचलेले बनाव असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान कैलास घाटे याच्या देहबोलीतून व वागणुकीतून संशय वाढला. चौकशीत उघड झाले की, त्याच्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्याला ऑनलाईन गेमिंगची सवय होती. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःवरच हल्ला करून लूट झाल्याचा देखावा केला.
स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरलेली सर्व २५ लाखांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन कासार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
हा तपास ऑनलाईन सवयींच्या आहारी गेलेल्या एका मॅनेजरने स्वतःच आपली इज्जत आणि जबाबदारी धुळीस मिळवत मोठा गुन्हा कसा रचला, याचे ताजे उदाहरण ठरले आहे.