क्राइम

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाराशिव येथे मोठी कारवाई: पोलिस कर्मचाऱ्यावर ४ लाखांच्या लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार मोबीन नवाज शेख (वय ४१) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ४ लाख रुपये लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका २४ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध आणि भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यातून भावाचे नाव कमी करण्यासाठी मोबीन शेख यांनी प्रथम ५ लाख आणि नंतर तडजोडीअंती ४ लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप आहे.लाचलुचपत विभागाने १७ जून २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पंचासमक्ष पडताळणी केली, तेव्हा मोबीन शेख यांनी ४ लाख रुपये लाच स्वीकारण्यास तयारी दर्शवली होती. मात्र, सापळा कारवाईदरम्यान त्यांनी लाच स्वीकारली नाही. अंगझडतीत त्यांच्याकडून एक बुलेटची चावी, पांढरा हातरुमाल, ८,६७० रुपये रोख आणि एक काळा Oppo मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीच्या अमृतनगर येथील निवासस्थानी घरझडती सुरू असून, त्याचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.मोबीन शेख यांना ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या नेतृत्वाखाली सहायक तपास अधिकारी विजय वगरे आणि पथकातील पोलिस नाईक अशिष पाटील, पोलिस शिपाई विशाल डोके आणि सिद्धेश्वर तावसकर यांनी केली. धाराशिवचे पोलिस अधीक्षक या प्रकरणाचे सक्षम अधिकारी आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close