दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच लाख पाच हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता आणि चारचाकी व दुचाकी वाहने यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि सचिन खटके यांच्या पथकाने 17 जून रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास तेरणा कॉलेज परिसरात पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की विमनतळकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही इसम दरोड्याची तयारी करत थांबले आहेत. पथकाने घटनास्थळी धाव घेताच दोन इसम मोटरसायकलवरून पळून गेले, तर इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केली असता त्यांची नावे धुपकिरण उर्फ अनिलशेट चौधरी (रा. बस्ती, उत्तरप्रदेश), निलेश उर्फ कांचन चव्हाण (रा. काकानगर, धाराशिव) आणि मुकेश शिंदे (रा. शिंगोली, धाराशिव) अशी असल्याचे समोर आले.
त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, काडतुसे, कोयता, संट्रो कार, बुलेट आणि ॲक्टीवा स्कूटर असा एकूण 5 लाख 5 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कौशल्याने केली असून, यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.