सायबर फसवणूक : दुबई पोलिसांच्या नावाखाली १.२० लाखांची ऑनलाइन फसवणूक

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात एका तरुणाची १.२० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी विरेंद्रकुमार संभाष मंडल (वय १९ वर्षे, रा. चौरस्ता पाणी टाकी जवळ, मुळगाव – बकीया, बिहार) यांनी तक्रार दिली आहे की, फेसबुक आयडी ‘संजय कुमार’ या नावाने संवाद साधणाऱ्या व्यक्तीने स्वतःला जिजा असल्याचे भासवले.
दि. १७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ३.३० वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत आरोपीने फिर्यादीला भ्रमणध्वनीवर कॉल करून “तुझ्या जिजाला दुबई पोलीसांनी अटक केली असून त्यांची सुटका करण्यासाठी ७ लाख रुपये लागतील, अन्यथा ७ वर्षांची शिक्षा होईल” अशी बतावणी केली.
या धमकीला घाबरून फिर्यादीने ऑनलाईन १.२० लाख रुपये आरोपीच्या सांगण्यानुसार ट्रान्सफर केले. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ३ जुलै २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून भा.दं.वि. कलम 318(4), 204, 3(5) सह आयटी कायदा कलम 66(C), 66(D) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.