गोवंशीय जनावरांची निर्दय वाहतूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

भूम (प्रतिनिधी ) – सदरील घटना 17 जून 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुम येथील फ्लोरा चौकात एका पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
भुम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमजान फरीद शेख (वय 21 वर्षे, रा. बावची, ता. परंडा, जि. धाराशिव) याने एमएच 18 बीएल 1454 या क्रमांकाच्या पिकअप वाहनात एकूण 11 वासरे, 1 जर्सी गाय, 1 रेडकु, 1 कालवड व 4 मयत वासरे अशा गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करत होता. या जनावरांची एकूण किंमत सुमारे 4 लाख 61 हजार रुपये इतकी आहे.
जनावरांच्या वाहतुकीदरम्यान त्यांच्यासाठी कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच जनावरांना निर्कभयतेने कत्तलीसाठी नेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे प्राण्यांवरील क्रुरतेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
याप्रकरणी भुम पोलीसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5(अ), 5(ब), 9, 9(अ) तसेच प्राण्यांशी क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 मधील कलम 11 (ड), (इ), (ई), (ऐ), (ठ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.